शेत शिवारात दाखल : शेतकरी भयभीत
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यातील ऊस उत्पादक क्षेत्रात सध्या ऊसतोड सुरू आहे. विशेषतः गोदाकाठच्या शिवारात तसेच फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, पैठण आदी तालुक्यातील हरीत पट्ट्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी असलेल्या जागा रिकाम्या होत आहे. त्यामुळे बिबटे बिथरले असून शेत शिवारात दाखल होत आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र भयभीत झाले आहेत.
यंदा चागल्या पावसाने गोदावरीसह इतर नद्यांना भरपूर पाणी आहे. याचाच फायदा घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस हे पीक घेतले. त्याचबरोबर मका, कापूस, तुर, कांदे अशी पिकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा बारमाही हिरवळीने नटलेल्या परिसरात मात्र बिबटयासारख्या हिस्त्र प्राण्यांचा मात्र धुमाकूळ वाढला आहे. त्यातच सध्या उसतोड सुरू असल्याने बिबटे मोकाट झाले आहेत.
त्यांना लपण्यासाठी आता पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री सर्वत्र बिबट्यांचा वावर दिसत आहे. त्यातच नेवरगाव येथील शिवारात शुक्रवारी (दि. २६) मध्यरात्री विष्णु लक्ष्मण वालतुरे यांच्या गट नंबर ३५३ क्षेत्रातील शेडमध्ये बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन त्याचा फडशा पाडला.
गोदावरी नदी नेवरगाव शिवारात असून नदी क्षेत्राला पक्षी अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले आहे. ऊसाच्या क्षेत्रामुळे व पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे या शिवारात बिबटे, रानडुकरे मोठ्या प्रमाणात आहे. मध्यंतरी वाहेगाव, शिंगी, मांजरी, माहुली, हैबतपूर, कानडगाव, ममदापूर शिवारात बिबट्यांनी हल्ले करुन पशुधन फस्त केले आहे. त्यामुळे शिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतात जायचे तर सोबत कोणाला तरी घेऊन जावे लागते. रात्रीच्या वेळेस तर शेतात एकटा शेतकरी जाऊच शकत नाही. कधी बिबट्या हल्ला करेल सांगता येत नाही.
दरम्यान, नेवरगाव येथील शिवारात शुक्रवारी मध्यरात्री विष्णु लक्ष्मण वालतुरे यांच्या शेडमध्ये बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन त्याचा फडशा पाडला. नित्य नियमाप्रमाणे ते सकाळी जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेले असता वासरु मृत आणि फाडलेल्या अवस्थेत दिसून आले.















